संपादकीय – ऑगस्ट २०२२

संपादकीय – ऑगस्ट २०२२

गेले काही दिवस अमेरिकेत सिएटल येथे वास्तव्य आहे. दिवसभर शहरात तसेच इतरत्र भटकंती व रात्री थोडे काम असा काहीसा संथ दिनक्रम सुरु आहे. यानंतर बृहन् महाराष्ट्र मंडळाच्या अटलांटिक सिटी येथील अधिवेशनाला हजेरी लावून भारतात परतणार आहे.

भारताबाहेर गेलो की आपण सतत त्या ठिकाणाची व भारताची, मुंबईची व पार्ल्याचीही तुलना करत असतो व ते सहाजिकच आहे. येथे अपार्टमेंटमधील कोणी एकमेकाला ओळखत नाही, अगदी शेजारी कोण रहाते हे सुद्धा माहित नसते. स्वत:चे घर असले तर प्रश्नच मिटला. आपण बरे की आपले काम बरे. त्यामुळे सामाजिक प्रभावाचा (चांगल्या व वाईटही) पूर्णपणे अभाव आहे. एका अर्थी आपल्याला हवे तसे मुक्त, स्वच्छंदी जीवन येथे लोकं अनुभवतात. स्वत:ची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी जिवापाड मेहेनत करतात. खूप पैसे कमवतात आणि तेवढेच खर्चही करतात. मात्र काही समस्या उद्भवली, संकट आले तर भावनिक आधाराच्या अभावाने त्यांना काहीसे एकटे पडल्यासारखे वाटत असावे अशी माझी समजूत आहे. नाही म्हणायला प्रत्येक समुहाच्या, गटाच्या संस्था तिथेही असतात ज्यायोगे मर्यादित स्वरुपात सहजीवन शक्य होते.

अजुन एक निरीक्षण म्हणजे सार्वजनिक आयुष्यात सर्व नियमांचे, कायद्याचे काटेकोरपणे पालन. येथे वाहन चालवताना सिग्नल तोडणे तर राहोच पण कोणी लेन सुद्धा सोडत नाहीत. आखून दिलेल्या जागेवरच पार्किंग केले जाते. वाटेल तिकडे कचरा टाकणे, रस्त्यावर थुंकणे ह्या गोष्टी अजिबात नाहीत. सर्व प्रेक्षणीय स्थळांची, ऐतिहासिक वास्तूंची, आस्थापनांची देखभाल अत्यंत व्यवस्थित व पर्यटकस्नेही. अमेरिकेत एक गंम्मत आहे, येथे सर्वच जण बाहेरुन आलेले. युरोप, आशिया, आफ्रिका, साऊथ अमेरिका, असे जगभरातून लोकं येथे येतात त्यामुळे कोणीच कोणाला ‘हा देश तूझा नाही’ असे म्हणू शकत नाही.

यंदा आपण देशाच्या स्वातत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. आपणा सर्वांनाच देशासाठी काहीतरी करावे असे वाटत असते. आपले जवान देशाच्या सीमांचे रक्षण करुन मातृभूमीची सेवा करतात. आपण काही सीमेवर लढायला जाऊ शकत नाही, मग आपण नागरिक काय करु शकतो ? पार्ल्यापुरते बोलायचे झाल्यास, जर आपण कचरा व्यवस्थापनात शिस्त आणली, वहातुकीचे, पार्किंगचे नियम काटेकोरपणे पाळले, सार्वजनिक जीवनात कायद्याचे, नियमांचे पालन केले, आपल्या संस्थांनी लोकाभिमुक कार्यक्रम, उपक्रम राबवले तर पार्ल्यातील जनजीवनाचा स्तर खचितच उंचावेल व ही सुद्धा एक मोठी लोकसेवा व पर्यायाने देशसेवा ठरेल.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top