संपादकीय – जून २०२२
कालच पार्ले टिळक विद्यालयाचा शताब्दी सांगता समारंभ दिमाखदार पद्धतीने साजरा झाला व दोन तीन दिवसात महिला संघाचा हीरक महोत्सव साजरा होणार आहे. पार्ल्यासाठी, पार्लेकरांसाठी व पार्ल्यात लहानाचे मोठे झालेल्या प्रत्येकासाठी ही अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. एखादी शिक्षणसंस्था सुरु करून ती इतके वर्षे निष्ठेने चालवणे ही सोपी गोष्ट नव्हे. ज्या काळी ह्या संस्था जन्माला आल्या त्या काळी शिक्षण हा धंदा किंवा व्यवसाय झाला नव्हता. ते एक व्रत होते, ती एक प्रकारची देशसेवा होती. त्याच विचाराने इतकी वर्षे जेव्हा ज्ञानदानाचे पवित्र कार्य सुरु रहाते तेव्हाच एक सुशिक्षित, सुसंस्कृत समाज निर्माण होतो. पार्ल्यातील ह्या दोन अग्रगण्य संस्थांनी पार्ल्याची इतके वर्षे अव्याहत सेवा केली आहे व एका अर्थाने पार्ले घडवले आहे. आज केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात पार्ले ‘शिक्षणाचे माहेरघर’ म्हणून नावाजले जाते ह्याचे मुख्य कारण म्हणजे पार्ले टिळक आणि महिला संघ ह्यासारख्या संस्था हे आहे.
कालानुरूप समाजातील सर्व गोष्टी बदलत जातात त्याच प्रमाणे शिक्षणाची उपयुक्तता, शिक्षण देण्याची पद्धत, विद्यार्थ्यांची आणि पालकांची मानसिकता ह्या गोष्टीसुद्धा बदलल्या आहेत. त्याची दाखल राज्यकर्त्यांनी, शिक्षणसंस्थांनी घेणे व शैक्षणिक धोरणात त्यानुसार बदल करत रहाणे ह्या गोष्टी अपेक्षित आहेत. ‘फक्त वर्गात शिकवले जाते तेच शिक्षण बाकी खेळ, गाणे, नाच, नाटक ह्या गोष्टी केवळ वेळेचा अपव्यय आहेत’ असे समजण्याचे दिवस आता राहिले नाहीयेत. आज पार्ल्यातील अक्षरशः हजारो मुले ह्या शिक्षण संस्थांमध्ये शिकत आहेत. एका अर्थाने पार्ल्याचे भवितव्य ह्या संस्थांच्या हातात आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यामुळे शाळेत घडणार्या प्रत्येक गोष्टीवर पार्लेकरांचे, पालकांचे बारीक लक्ष असते. शिक्षक कसे शिकवतात ? मुलांना मारतात का ? शाळेत खेळांना व इतर कलागुणांना वाव आहे का ? इथपासून ते टॉयलेट्स साफ असतात का ? कॅन्टीन मधील पदार्थांचा दर्जा कसा असतो ? इथपर्यंत सर्व गोष्टींची समग्र चर्चा पार्ल्यात होत असते व ते सहाजिकच आहे.
एकेकाळी फक्त मराठीतून शिक्षण देणार्या आपल्या शाळांमध्ये कालानुरूप इंग्लिश माध्यम व आता ICSE सुरु झाले आहे. खेळाचे व अभ्यासेतर उपक्रमांचे महत्वसुद्धा वाढले आहे. ह्यापुढेही असेच प्रगतिशील धोरण आपल्या शिक्षणसंस्था राबवतील व पार्ल्यातील विद्यार्थी जगभरात आपले, आपल्या संस्थेचे व पर्यायाने पार्ल्याचे नाव उज्ज्वल करतील ह्यात शंका असायचे कारण नाही !
