संपादकीय – नोव्हेंबर २०२२
आपले पार्ले हे विद्येचे माहेरघर आहे त्याचप्रमाणे ते मुंबईतील महत्वाचे सांस्कृतिक केंद्र सुद्धा आहे. अनेक क्षेत्रातील दिग्गज मंडळींचे वास्तव्य पार्ल्यात आहे किंवा त्यांची पार्ल्यात राहायला यायची मनोमन इछा आहे. ह्या सगळ्याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. पण मित्रांनो, ह्या गोष्टी काही पटकन जुळून येत नाहीत. यासाठी पार्ल्यातील शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांनी अनेक तपे केलेली अपार मेहेनत कारणीभूत आहे हे नाकारता येणार नाही. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आज पार्ल्याच्या सामाजिक जीवनाला एक ऊंची प्राप्त झाली आहे.
या सर्वात एक गोष्ट विसरली जाते ती म्हणजे पार्ल्यातील लोक चळवळी. मोठ्या संस्थांकडे स्वतःची वास्तू असते, पैश्याचे पाठबळ असते, त्याचा खूप मोठा फायदा कार्यक्रम, उपक्रम राबवण्यात होतो. लोक चळवळी ह्या काही समविचारी तरुणांच्या डोक्यातील फक्त कल्पना असतात, त्यांच्या डोळ्यासमोर भविष्यातील समाजाचे चित्र असते, त्यांच्या प्रतिभेची भरारी असते. अशाच विचार मंथनातूल पार्ल्यात स्वातंत्र्यानंतर सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात अनेक लोक चळवळी उभ्या राहिल्या. ह्यात मामा कुलकर्णीची हुंडा विरोधी चळवळ, तात्या पटवर्धनांची संगीत नाटकांची चळवळ, विजय बोन्द्रेचा गॉसिप ग्रुप, विलेपार्ले म्युझिक सर्कल, आपटे सरांची जनसेवा समिती, त्याच बरोबर शेफाली, मृगजळ, प्रथमेश, हृदयेश, उत्तुंग, पार्ले कट्टा, प्रबोधन मंच ह्यासारख्या संस्था, ह्या सर्वांनीच पार्ल्यातील सामाजिक सांस्कृतिक वातावरण टिकविण्यात आणि वृद्धिंगत करण्यात महत्वाचा वाटा उचलला आहे. मामांच्या हुंडा विरोधी चळवळीचा दबदबा महाराष्ट्रभर होता. गॉसिप ग्रुपनी बसवलेली अफलातून नाटके, त्यावरून उफाळलेले वैचारिक वाद ह्याची आठवण आजही नाट्यक्षेत्रात निघते. एकेकाळी मृगजळ एकांकिका स्पर्धा मुंबईतील अग्रगण्य स्पर्धा समजली जात असे. म्युझिक सर्कल, प्रथमेश, हृदयेश, ह्यांनी पार्ल्याला दिलेला संगीताचा संस्कार कधीही न विसरण्यासारखा आहे. जनसेवा समितीच्या कुठल्याच उपक्रमात सहभागी न झालेला तरुण पार्ल्यात शोधुनही सापडणार नाही. पार्ले कट्ट्यावर येणारा पाहुणा संपूर्ण पार्ल्याचाच लाडका होतो. प्रबोधनच्या सामाजिक विषयांवरील कार्यक्रमांमधे लोकांचा ऊत्स्फुर्त सहभाग असतो. कुठलेही पाठबळ नसताना केवळ आंतरिक उर्मीने, सामाजिक जाणीवेने आणि दुर्दम्य आत्मविश्वासाने मार्गक्रमण करणार्या ह्या संस्थांनी पार्ल्याची सांस्कृतिक परंपरा समृद्ध केली आहे ह्यात शंका नाही.
पार्ल्याच्या विषय निघाला कि अनेकवेळा फक्त मोठ्या, मान्यवर संस्थांचा उल्लेख होतो, त्यांच्या कार्याचा गौरव होतो व बहुतेक वेळी ह्या लोक चळवळींचा विसर पडतो. तसे होता कामा नये. पार्ल्याच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रवासात त्यांचे योगदान सुद्धा महत्वाचे आहे, होय ना !
ज्ञानेश चांदेकर
