संपादकीय – ऑक्टोबर २०२२
‘पुणे तिथे काय उणे ?’ ही उक्ती पार्ल्याला सुद्धा लागू पडते. काय नाही आपल्या पार्ल्यात ? शिक्षणाची उत्तम सोय, सभ्य, पापभिरू, शांतताप्रेमी, सुसंस्कृत समाज, सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांची रेलचेल, आणि हो, हाकेच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आणि विमानतळ. काही पार्ले वेडे त्यात ‘हमारे पास (भेळवाला) शर्मा है’ किंवा ‘हमारे पास (वडावाला) बाबू है’ अशीही भर घालतील. ह्यातील विनोदाचा भाग सोडला तरी पार्ले हे एक परिपूर्ण, स्वयंपूर्ण उपनगर आहे ह्यात काहीच दुमत होण्याचे कारण नाही. उगाच नाही मुंबईभरचे आणि बाहेरचेही मराठी लोकं पार्ल्यात घर घेण्याचे स्वप्न उराशी बाळगून असतात !
मित्रांनो, ह्याला एक दुसरी बाजू देखील आहे. जगभरात आणि आपल्या देशात सुद्धा श्रीमंत आणि गरीब ह्यांतील दरी वाढत चालली आहे. ‘आहे रे’ आणि ‘नाही रे’ ह्यांच्यातील संघर्ष पूर्वापार चालत आलेला आहे पण आज तो अत्यंत विदारक स्वरूपात समोर येत आहे. शनिवार रविवारी पार्ल्यातील हॉटेले, पब्स ओसंडून वहात असतात. कपड्यांचा व इतर चीजवस्तूंचा बाजार तर वर्षभर फुललेला असतो. पार्ल्यातील प्रत्येक बँक आपले आर्थिक लक्ष्य ओलांडून पुढे जात आहे. पण ह्या सुखवस्तू, चंगळवादी समाजाच्या पलीकडे सुद्धा आपल्या पार्ल्यात असा एक समाज आहे जो जगण्याशी संघर्ष करतो आहे, अर्धवट शिक्षण, म्हणायला नोकरी व त्यामुळे वाट्याला आलेले निम्नस्तराचे जगणे. पार्ल्यातील अभिरुचीपूर्ण कार्यक्रमांशी ह्याचे काही देणेघेणे नाही. महिन्याचा खर्च भागवण्यातच त्याची पुरती दमछाक होते. काही आजारपण आले तर सरकारी हॉस्पिटलमध्ये ओळख नसल्याने जागा मिळत नाही आणि खाजगी दवाखान्याचा खर्च परवडत नाही. पार्ल्यातील व आजूबाजूच्या अनेक वाड्यांत, वस्त्यांत हा समाज पसरला आहे पण त्याच्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही. एका अर्थी आपण त्यांचे अस्तित्वच नाकारतो म्हणा ना !
आज आमच्या सामाजिक संस्थांच्या कार्यक्रमांना गर्दी होत नाही कारण आमच्या नवीन पिढीला इतर अनेक आकर्षणे आहेत. त्यांना आपले सांस्कृतिक कार्यक्रम ‘outdated’ वाटतात. खरे म्हणजे ह्या संस्थांची गरज आहे ‘नाही रे’ समाजाला. शिक्षणाचे महत्व पटवणे, वैद्यकीय मदत पुरवणे, त्यांच्या मुलांमधे नोकरी मिळवण्याची योग्यता निर्माण करणे, व्यसनाधिनता कमी करणे, ह्या समाजात असे अनेक उपक्रम राबवण्याची गरज आहे. श्रीमंतांच्या मनोरंजनाचे चोचले पुरवण्यापेक्षा गरीबाच्या दोन वेळच्या मीठ भाकरीसाठी आपण काही मदत करू शकलो तर त्याचे महत्व नक्कीच जास्त आहे. आमच्या सामाजिक संस्था ह्या वास्तवाकडे लक्ष देतील काय ?
