संपादकीय – जुलै २०२२
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासूनच पार्ले गाव वसायला सुरवात झाली होती पण १९०७ साली विलेपार्ले स्थानक बांधण्यात आले आणि गावातील वस्ती वाढू लागली. पहिल्यापासून राहणाऱ्या ख्रिश्चन व कोळी समाजाबरोबरच आता मराठी चाकरमानी मंडळी सुद्धा येथे राहू लागली. लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर लगेचच त्याच्या प्रेरणेने पार्ल्यात पार्ले टिळक विद्यालय व लोकमान्य सेवा संघ ह्या संस्था उभ्या राहिल्या आणि खऱ्या अर्थाने येथील रहिवाश्यांचे सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक सहजीवन सुरु झाले. त्यानंतरच्या काही वर्षात पार्ल्यात अनेक संस्था उभ्या राहिल्या आणि ह्या सर्वांनी आपापल्या परीने, आपापल्या कुवतीनुसार पार्ल्याच्या परंपरेत भर घातली, अजूनही घालत आहेत.
त्यावेळच्या समाजधुरीणांनी काळाची गरज ओळखून त्याच प्रमाणे भविष्याचा कानोसा घेऊन आपल्या कार्यक्रमांची, उपक्रमांची आखणी केली होती व त्यामुळेच आजचा सशक्त, जागरूक व बुद्धिजीवी समाज तयार झाला आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. आज काळ बदलला आहे, जगणे जास्त संघर्षमय झाले आहे, तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे, तरुणांचे भावविश्व, प्रतीके, आदर्श, सर्व काही बदलले आहे पण पार्ल्यातील संस्था मात्र पाहिजे तेवढ्या बदलल्या नाहीत असे खेदाने म्हणावे लागते. पूर्वापार चालत आलेले कार्यक्रम करण्यातच धन्यता मानली तर कसा येणार तरुण तुमच्याकडे ? संस्थेत तरुण येत नाहीत हा त्यांचा दोष नसून आपले अपयश आहे ह्याची जाणीव आम्हाला कधी होणार ? आजच्या जीवनाशी निगडित विषयांवरील उपक्रम सुरु केल्यास, तरुणांना त्यांच्या करिअरमध्ये फायदा होईल अश्या विषयांवर कार्यक्रम केल्यास (व त्याची चांगली जाहिरात केल्यास) का नाही तरुणाई गर्दी करणार ? काळानुसार सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक संस्थांची भूमिकासुद्धा बदलली पाहिजे हे केव्हा समजणार आम्हाला ?
नुकतीच टिळक मंदिराची निवडणूक पार पडली असून नवीन कार्यकारी मंडळ अस्तित्वात आले आहे. मंदिराचे शतक महोत्सवी वर्ष सुरु आहे. नवीन टीम आपली जबाबदारी ओळखून, समाजाची, तरुणांची तसेच ज्येष्ठ नागरिकांची गरज लक्षात घेऊन, नाविन्यपूर्ण कार्यक्रम, उपक्रम आखतील अशी अशा करूया !
