संपादकीय – सप्टेंबर २०२२

संपादकीय – सप्टेंबर २०२२

मुंबई महानगर पालिकेच्या निवडणूका ह्यावर्षी मार्च मध्ये होणार होत्या पण अनेक कारणांनी त्या पुढे ढकलण्यात आल्या. आता पावसाळ्यानंतर त्या होतील अशी अपेक्षा आहे.

आपले पार्ले विद्येचे माहेर आहे, मुंबईतीलच नव्हे तर महाराष्ट्रातील महत्वाचे सांस्कृतिक केंद्र आहे. बहुतेक मराठी कुटुंबांचे पार्ल्यात घर घेण्याचे, राहण्याचे स्वप्न असते. हे सर्व जरी खरे असले तरी पार्ल्यात सर्व आलबेल आहे, कुठलेच प्रश्न नाहीयेत असे बिलकुल नाही. रहदारी, पार्किंग, कचरा नियोजन, अनधिकृत फेरीवाले, असे अनेक प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. पुनर्विकासाच्या प्रक्रियेमुळे पालिकेच्या सेवांवर अधिकच ताण पडणार आहे. पार्लेकरांची पाण्याची, रस्त्यांची, पार्किंगची गरज वाढतच जाणार आहे. कश्या पुरवणार ह्या गरजा ? आमच्या लोकप्रतिनिधींनी, प्रशासनाने ह्यावर काही विचार केला आहे का ?

पार्ल्यातील सर्वात मोठा प्रश्न आहे फनेल झोन बाधितांचा. फनेल झोनमुळे पार्ल्यातील अनेक इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. गेली अनेक वर्षे हे लोकं लोकप्रतिनिधींकडे, सरकारकडे, प्रशासनाकडे खेटे घालत आहेत पण अजूनही ह्या प्रश्नाचे घोंगडे भिजतच पडले आहे. कोणी म्हणते क्लस्टर डेव्हलपमेंट हा मार्ग आहे, कोणी म्हणते स्वयंविकास हा मार्ग आहे पण वास्तव हे आहे कि ह्यातील अनेक इमारतींची अवस्था आज बिकट आहे. काही अपघात झाला, (होऊ नये पण) दुर्दैवाने एखादी इमारत कोसळली तर त्याची जबाबदारी कोणाची असणार आहे ? पार्ल्याच्या लोकप्रतिनिधींनी, राजकीय नेत्यांनी ह्या विषयावर अनेक सभा घेतल्या, हा प्रश्न सोडवण्याची अनेक आश्वासने दिली पण परिस्थिती ‘जैसे थे’ अशीच आहे.

पालिका निवडणूक जवळ येत आहे. सर्वपक्षीय उमेदवार मतांचा जोगवा मागायला मतदारराजाच्या दरवाज्यात येणार आहेत. आमचे सर्व उमेदवारांना कळकळीचे आवाहन आहे की मत मागण्याबरोबरच पार्ल्याचे प्रलंबित प्रश्न सोडविण्याबाबत आपल्याकडे काय योजना आहे ह्याची सविस्तर माहितीसुद्धा आपण मतदाराला द्यावी. आमच्या मतांच्या बदल्यात आपल्याकडून आश्वासनांची नव्हे तर कामाची व रिझल्टसची अपेक्षा आहे !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top